दूरदेशीच्या पाखरा

हिशेब ही सुद्धा अजून एक अशीच मजेशीर गोष्ट! कारण हिशेबाचा संबंध गणिताशी येतो.. एका अस्सल भौतिक विश्वाशी येतो. या जगात दोन अधिक दोन चारच होतात, ते जर झाले नाहीत तर हिशेब चुकला हे अगदी नक्की. आयुष्याचा हिशेबासाठी चालू असलेली जुळवाजुळव म्हणजे थोडक्यात आनंदाच्या क्षणांतून दुःखांच्या क्षणांची वजाबाकी. बहुतेकांच्या नशिबात या हिशेबाची बाकी शून्य असते. थोडक्यात आपल्या लोकांपासून आपण खूप दूर आलेलो असतो किंवा आपलेच लोकं आपल्याला सोडून गेलेली असतात. या विरहाची कारणमीमांसा गणितात मांडता येणारी नसते. तेव्हा माणूस त्या दूर गेलेल्याची आठवण काढू लागतो मनातल्या मनात बोलावू लागतो. कधी कधी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत..

दूरदेशीच्या पाखरा
कधी जमलंच तर परत ये ,
तू दिलेले शब्द मी
ठेवलेत जपून काही

भातुकलीचे घरटे
तुझे माझे शेणाचे, मेणाचे ,
त्या घरट्याचे तुकडे
ठेवलेत जपून काही

रुसण्याचे खेळ तुझे
दोन गडी पण राज्य माझे ,
तुला हसवण्याचे क्षण
बसलेत रुतून काही

वर पाहतो मी आता
चंद्र निस्तेज अबोल दिसतो ,
जणू स्पर्शाच्या चांदण्याला
गेलेत विसरून काही

वाट पाहण्यासाठी
आता काळही साद देत नाही ,
आपल्या भेटीसाठी श्वास
ठेवलेत राखून काही…

Rolla, MO (US)

Disclaimer & Policy

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *