एका नोकरदाराचे मनोगत ..

एव्हढं महात्म्यांपर्यंत जायची गरज नाहीये… सामान्य नोकरदाराचही आयुष्य नशिबावर काही कमी अवलंबून नसतं. पण नोकरदार माणसाला पळवाट नसते त्याला त्याच्यामधुनच जावं लागतं , त्यातून सुटका नाही. कधी कधी तो बोलू लागला की आश्चर्य वाटतं , फाईल बरबटवणाऱ्या आणि जोडे झिजवणाऱ्या माणसाला काय वाटतं आणि विशेष म्हणजे तो आजूबाजूच्या गोष्टींबद्दल बारीक सारीक निरीक्षणं करून ठेवतो ..

जगणे आणि मरणे यांचे
असो कुणाचे कोडे
आमुच्या नशिबी मात्र
फाईल आणि जोडे

बाईशी साहेब कसा तो
बोलतो हसून
तंगडी पसरून का तो
भुंकतो बसून
त्याच्याच हाती आता
कागदाचे स्वैर घोडे
आमुच्या नशिबी मात्र ..

मानेला बाक आमच्या
पाठीला अन पोक
निवांत क्षणीही आमच्या
बुडाखाली टोक
यावर नियतीचे ,
नखरे असतात थोडे
आमुच्या नशिबी मात्र ..

मांडले पट जयांनी
ते आमचे मायबाप
सापशिडीवरती का
आम्हाच सापडे साप
शेपटी झाडणारे किती
चढतात शिडी निगोडे
आमुच्या नशिबी मात्र ..

रचतो मनोरे आणिक ती
रद्दी कागदाची
हसतो वरून मीही आत
शाई आसवाची
स्वप्नांच्या पडले पायी
नोकरीचे जाड तोडे
आमुच्या नशिबी मात्र ..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *