संध्याचर

एकदा एखादी गोष्ट भावली की ती बदलू नये असं वाटण यात मात्र माणसाचा स्वार्थ नसतो … ती एक भीती असते कारण तीच गोष्ट जर निराळच वस्त्र , चेहरा घेऊन आली तर त्याचे स्वागत कसे करावे कळत नाही. कदाचित ते नवीन रूप स्वागत करण्याजोग ही नसू शकत ! तेव्हा असं वाटत की मोहक संध्येची सवय का झाली मला ? या सवयीमुळे मला संध्यावेडा करून टाकलंय. त्यामुळे जेव्हा मला या संध्याकाळी एकाकी वाटू लागत तेव्हा मन या भीतीने उद्विग्न होत की आजची ही संध्याकाळ रम्य नसून तो दिवसाचा अंत आहे … एकांतात डोळ्यासमोर घडणार सार अघटीत वाटू लागत , रातराणीचं बहरण विरह गाण वाटू लागत आणि दवबिंदुंचे अश्रू !… याच वेळी मेघ जर कधी दाटून आले तर मनात एक विचित्र अंधार पडतो , एक विचित्र शांतता पसरते . आज हे मेघ सार सार वाहून नेणार अशी एक भीती वाटू लागते… त्याच्या आधी आपणच रडून घ्यावस वाटत पण या प्रश्नोत्तरांवर आधारलेल्या जगात मिसळण्यासाठी मूक आक्रोश करावा लागतो… तेव्हा मात्र हे ‘संध्याचर’ पण तो एकांत सगळ नकोसं वाटू लागत ..

पर्वताच्या पिंडीवरती
कावळ्यांची जमली टोळी ,
दिसला असेल त्यांना
चालताना चंद्रमौळी

कावकाव त्यांची येते
अंत्यगीत गातागाता ,
पदर रे केशरी ढळला
दिनकराचे गीत गाता

आणि मृत्युच्या भयाने
सूर्य लपला पृथ्विमागे,
घनगर्द मेघांचे तांडव
क्षितिजावर झाले जागे

रातराणीचे विरहगाणे
उमलेल फांदीवरती ,
अश्रुंचे दवबिंदू
गवताच्या पातींवरती

माथे टेकले दिवसाने
दारावर चांदण्याच्या ,
उधळून आल्या नभी
माला तारकाफुलांच्या

असला नको रे एकांत
असला नको दिवस दिनकर
असला नको रातवारा
असला नको मी संध्याचर

Rolla, MO (US)

Disclaimer & Policy

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *