काल

प्रेमाच्या पाकळ्या वेचत वेचत माणूस कुणाचा तरी माग काढत ज्या रस्त्यांवरून चालत असतो , ते रस्ते तसे नागमोडी वळणांचे … ओंजळीत साठवलेल्या पाकळ्या हळू हळू सुकून जाऊ लागतात आणि त्यांच्या गंधांच्या आठवणी होऊ लागतात. या तथाकथित प्रेमाच्या अनिश्चित वाटांवर चालताना एका सहचारिणीचा  विसर पडलेला असतो ती म्हणजे वेळ. पावलागणिक लांब आणि धूसर होत जाणाऱ्यां रस्त्यांना फाटे फोडण्याच काम ही वेळ करते. माणसाला चालण्याची इतकी सवय होते की तो रस्त्याचा एक घटकच बनून जातो आणि त्याला फाटे आणि वळणांच भान रहात नाही. मग कोणत्यातरी एका वळणावर उमगत की हे चुकीच वळण आहे पण तेव्हा उशीर झालेला असतो … बरीच वळणे चुकीची झालेली असतात. आठवणी साचून साचून मनाची अडगळ झालेली असते आणि त्यातच तो प्रत्येक चुकलेल्या वळणाचा हिशोब मांडू लागतो. कारण अजूनही त्याची स्वप्न बघायची उर्मी संपलेली नसते आणि मागे उरलेल्या असतात काही वाटा, आठवणीत ओथंबलेले काही क्षण आणि काही श्वास …

त्या विरल्या गोड क्षणांना अडगळीत शोधत होतो ,
चुरगळलेल्या वहीत माझ्या हिशोब मांडत होतो .

अडगळीत होते सूर काही, तुजसाठी आसुसलेले
शब्दही हरवलेले आणि अश्रुंत विरघळलेले
एकाकी भरकटलेले, माझेच गाणे गात होतो
त्या विरल्या गोड क्षणांना..

तुझ्या कोमल स्पर्शांना, अंधार झाकून होता
जपून ठेवलेला चंद्र मी,  धूळ पांघरून होता
हवेत धुंद तुझे हसणे.. आणि मी रडत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना..

तू सांग मला सखेगं, वेदनांचे काय करू मी
नभ दाटल्या मनाच्या, प्रश्नांचे काय करू मी
वेडावलेला असा मी, मलाच बोलत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना..

प्रश्न ओघळले जणू की नदीने बांध फोडावे
उदास होतो मी की, ज्योतीने डोळे मिटावे
तुटल्या आयुष्याचे, मी तुकडे वेचत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना..

आक्रोश हा मौनाचा, भिंतींना तोडून जातो
अन अंगणात माझ्या,  प्राजक्त दाटून येतो
खिडकीत उभा,  फसव्या वाटांना पाहत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना..

किती सांगू मी मनाला ,तोही ऐकत नाही
त्या नाजूक पावलांना, अजून विसरत नाही
कासाविस झाल्या श्वासांना मोजत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना..

Rolla, MO (US)

Disclaimer & Policy

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *