मी आणि कोपऱ्यातला कंदील …

कोणाला काही मागून कधी मिळतं थोडंच ! तिच्याच्याने हे देखील होत नाही. मग काय करणार … रात्रीचे जागे रहाण्याचे सत्र सुरु होते आणि मग नाना तऱ्हेचे विचार मनामध्ये येऊ लागतात. मन खूप वेगवेगळ्या वाटांवरून चालून बघते, थोडं डोकावून बघते पण कोणीच दिसत नाही. तेव्हा मात्र भरपूर लोकांनी वेढलेले असूनही एकाकी असणं म्हणजे काय ? याची प्रचीती येते. विचारांच्या समुद्रात मनाच्या पटलांचं थैमान घालून झालं की शेवटी काहीच काहीच उरत नाही एका बाजूला मी असतो आणि दुसऱ्या बाजूला एक मिणमिणता कंदील …

ती रोज येते, माझ्याकडे बघते आणि
क्षितिजाच्या कडेला रडत बसते
मी रोज एकटाच बसलेला असतो आणि
चंद्र, नक्षत्रांची कोडी सोडवत बसतो

चुकांचे हिशोब वारा उडवून लावतो आणि
कधी आठवणींच्या वाटांवर धावतो
भुतकाळाचा रागही येतो अधून मधून
फसव्या गोड क्षणांवरही थोडा हसतो
सारं सारं विसरायचं असतं मला
आणि झाडीत वाट विसरलेला पक्षी फडफड करत असतो

दीपस्तंभ व्हायचं आहे ज्यांना त्यांनी व्हावे खुशाल
मी तर अधांतरी सोडलेली एक नाव झालो आहे
मी कुणाला वाट काय दाखवणार ?
मनाच्या वाटेवर चालता चालता मीच किनाऱ्यापासून दूर आलो आहे

रडायचंही असतं ,
कोणाला दाखवायचंही नसतं
आणि मन
हसण्याच्या भिंतीमागे लपून बसतं

मी माझंच गाणं गुणगुणत असतो
भिंतीच्या बाहेर प्रश्न उभे असतात
रात्री दोनच गोष्टी जळत असतात
मी आणि कोपऱ्यातला कंदील …

Spread the love

1 thought on “मी आणि कोपऱ्यातला कंदील …”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *