साजणवारा

मी जर जन्म आणि मृत्यू यांच बोलू लागलो तर लोकं म्हणतील गतजन्म आणि पुनर्जन्मावर आमचा विश्वास नाही. हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ !… पण माणसाचं मन खरच कुणाला उलगडलय का हो ?! माणसाचं मन म्हणजे एक साध सरळ आणि सोप चक्रव्यूह आहे. मनात अडकून पडलेला माणूस असो किंवा माणसात गुंतलेल मन असू दे , त्याचे स्वतः चे काही ठरलेले खेळ किंवा पोरखेळ असतात. त्याचे हट्ट तर त्याहून विचित्र ! आयुष्याचा मोह सुटता सुटत नाही आणि एकांत वेळी कधी संध्याकाळी या मनात एक राधा घर करून बसते. कृष्णाची वाट ती ओढीने पहातही असेल पण या जन्म मृत्यूत अडकलेल्या सामान्य जीवांना आपल्याच जगण्याच ऋण वाटू लागत. तेव्हा वाटत की भगवंताने आपल्या पावेसकट यावे आणि चिंब करून टाकावे अवघे जीवन ! त्याचेच दिलेले ऋण त्यानेच जणू फेडावे … किंवा ते ऋण फेडणाऱ्याला भगवंत मानावे … कदाचित म्हणूनच राधा … ?

सांजेचा साजणवारा, उभा आहे खिडकीपाशी
मेघांची हळुवार हितगुज, आहे सुरु कशाशी ?

विहिरीचे गहिरे पाणी, मातीतून झिरपून जाते
थकल्या मळक्या पंखांना, मोत्यांनी भिजवून जाते

निजू लागल्या सावल्या, झुडुपांमध्ये का खळबळ ?
दरीतून रात्रीच्या आल्या, गर्द सर्पांची का सळसळ ?

ती ज्योत थांबली होती, देवळात निजण्यासाठी
अश्रुंचे फुटले बांध, ते चरण भिजवण्यासाठी

मनाच्या बंद घराचे, वाजले अचानक दार
पायरीवरल्या पावेचा, त्या ‘राधेला’ आधार

त्या बंद खिडकिंवाटे, उघडले डोळे मनाचे
दाटून आले घाईने, ते उर ‘कृष्ण’ घनाचे !

Rolla, MO (US)

Disclaimer & Policy

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *